माहूर ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारीला मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

✍🏻 बबलु भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर (सहसंपादक)
✍🏻समाधान कांबळे (माहूर तालुका प्रतिनिधी)

श्रीक्षेत्र माहूर :- (दिनांक ५ जानेवारी) येथील ग्रामीण रुग्णालयात ७ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत आदिवासी भागात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचा सर्व जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे.

या शिबिरात हायड्रोसील (अंडवृध्दी), हर्निया, अपेन्डिक्स, शरीरावरील सर्व गाठींच्या शस्त्रक्रिया व दंतचिकित्सा, औषधोपचार मोफत करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. वाघमारे यांनी दिली. तसेच ३५ वर्षांवरील सर्व महिलांचे गर्भाशयमुख व स्तन कॅन्सर तपासणी आणि उपचार, दंतचिकित्सा व उपचार, मानसिक आजार आणि उपचार, उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी, सिकलसेल तपासणी अन् उपचार, रुग्णांचे एक्स-रे, ई.सी.जी., सोनोग्राफी, व रक्त तपासणी मोफत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माहूर येथील सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी यांची असंसर्गजनिक रोग तपासणी, रुग्णांचे एक्सरे, इसीजी, सोनोग्राफी व रक्त तपासणी मोफत केली जाणार असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण रुग्णालयातील शस्त्रक्रिया गृह हे सुसज्ज व सर्व सोयीयुक्त असून येथे शस्त्रक्रिया कक्षात नांदेड जिल्ह्यातील नामांकित सर्जन व भूलतज्ज्ञांच्या देखरेखीखाली शस्त्रक्रिया केली जाणार आहे.
शस्त्रक्रियेसाठी लागणारे साहित्य व औषधोपचार मोफत करण्यात येणार आहेत. याशिवाय शिबिरात येणाऱ्या सर्व रुग्ण आणि नातेवाईकांचे आभा कार्ड काढले जातील, असेही डॉ. वाघमारे यांनी सांगितले. शिबिराचे आयोजन उपसंचालक डॉ. अर्चना भोसले- किर्दक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. राजाराम बुट्टे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश माचेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरणकुमार वाघमारे यांनी केले आहे.

पत्रकार परिषदेला रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे, किशन राठोड यांच्यासह डॉ. विनीत बाभळे व डॉ.अभिजित अंबेकर यांची उपस्थिती होती.
