महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सर्वसमावेशक ‘सहविचार सभा’ संपन्न

महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या सुशोभीकरणासाठी सर्वसमावेशक ‘सहविचार सभा’ संपन्न सभेत महाड क्रांती स्तंभावर ‘भीमसृष्टी’ उभारणीसाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांची ठाम भूमिका बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह महाड येथे महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे सुशोभीकरण प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर ३१ मार्च रोजी ‘सहविचार सभा’ आयोजित करण्यात आलीआहे.

या बैठकीत मंत्री भरत शेठ गोगावले यांनी बौद्ध समाजातील विविध संस्था, संघटना व प्रतिनिधीं सोबत सविस्तर संवाद साधत प्रकल्पाच्या अंमलबजावणी बाबत सर्वांच्या भावना जाणून घेतल्या.

दिनांक २० मार्च रोजी भूमीपूजन झालेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम अत्यंत नियोजनबद्ध, पारदर्शक आणि ऐतिहासिक वारसा जपत पूर्ण व्हावे, यासाठी मंत्री गोगावले यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

बैठकीदरम्यान उपस्थित मान्यवरांनी चवदार तळ्याचे सौंदर्य, पावित्र्य आणि ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी विविध सूचना मांडल्या. या सर्व सूचनांचा सकारात्मक विचार करून त्या प्रकल्पात समाविष्ट केल्या जातील, असे आश्वासन मंत्री गोगावले यांनी दिले. यावेळी बोलताना मंत्री गोगावले म्हणाले की, “चवदार तळे प्रकल्प हा केवळ विकासाचा उपक्रम नसून तो सामाजिक अस्मिता आणि स्वाभिमानाचा विषय आहे. या ऐतिहासिक कार्यासाठी शासन स्तरावरून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.”

तसेच, महाडच्या ऐतिहासिक वारशाला जागतिक स्तरावर ओळख मिळावी, यासाठी क्रांती स्तंभ परिसरात भव्य ‘भीमसृष्टी’ उभारण्याबाबतही मंत्री गोगावले यांनी आपली कटिबद्धता व्यक्त केली. या प्रकल्पाद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि चवदार तळे सत्याग्रहाच्या इतिहासाचा प्रभावी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या सहविचार सभेला विनायक हाटे, मोहन खांबे, सुनील पिठू जाधव, तुळशीराम जाधव, विजय साळवी, अशोक जाधव, राहुल साळवी, बिपीन साळवी, लक्ष्मण जाधव, प्रभाकर खांबे, दीपक मोरे, भीमराव साळवे, सुनीता गायकवाड, सचिन धोत्रे, सखाराम जाधव, दीपक साळवी, सचिन कासारे, प्रवीण साळवी, रवी धोत्रे, बाळा धोत्रे, अरुणा आजगांवकर, सोनाली हाटे यांच्यासह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

