विडूळ येथे क्षुल्लक कारणावरून हाणामारीत मोठ्या भावाचा मृत्यू; आरोपीस अटक
✍️सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड :- तालुक्यातील विडूळ येथील एका घरगुती वादातून घडलेली एक खळबळजनक घटना उघडकीस आली, विडूळ देवसरी रस्त्यावरील अवैध दारू अड्डयावर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दोन भावंडांच्या हाणामारीत मोठ्या भावाच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.


विनोद दत्ता नरवाडे ( ३४, रा. विडुळ) असे मृतकाचे नाव आहे. तर आरोपी अविनाश दत्ता नरवाडे वय 32 वर्ष याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून पोलीसांनी त्यास अटक केली आहे. विडुळ ते देवसरी रस्त्यावरील एका अवैध दारूच्या अडुयाजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या सख्ख्या भावांमध्ये काही क्षुल्लक कारणावरून दि 11 मार्च रोजी वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत मृताच्या डोक्यात लाकडी दांड्याने प्रहार झाल्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि पोलिसांनी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत जखमीला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर जखमीला नांदेड येथे रेफर केले.

दरम्यान, गुरुवारी दि 12 रोजी उपचारादरम्यान गंभीर जखमीचा नांदेड येथे मृत्यू झाला. या प्रकरणी लहान भाऊ अविनाश दत्ता नरवाडे वय 32 वर्षे याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले या प्रकरणाचा तपास एपीआय विनायक रामोड हे करीत आहेत.
