अपराधताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळ

सोने विक्रीचे आमिष दाखवून तेलंगणातील व्यापाऱ्याला ७० हजार रुपयांना गंडविणाऱ्या तिघांना अटक

(स्वस्तात सोने देण्याचा केला बहाणा, फर्निचर विक्रीच्या संपर्कातून साधला डाव)

✍🏻 बबलू भालेराव (मुख्य संपादक) ✍🏻 सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक)

महागाव (दिनांक २३ एप्रिल) कमी भावात सोने विक्रीचे आमिष दाखवून तेलंगणातील व्यापाऱ्याला ७० हजार रुपयांना गंडविणाऱ्या तिघांना महागाव पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.

मुडाणा गावाजवळ बुधवार (दि. १६) एप्रिल रोजी ही फसवणुकीची घटना घडली. शहाबाद आयुब खान यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपींना जेरबंद केले.

या प्रकरणी भैसा, जिल्हा निर्मल (तेलंगणा) येथील फर्निचर व्यावसायिक शहाबाद आयुब खान (वय ३५) यांनी फिर्याद दिली आहे. खान यांनी १३ एप्रिल रोजी मुडाणा येथे फुटपाथवर सोफासेट विकणाऱ्या एका व्यक्तीकडून कमी किमतीत सोफा खरेदी केला होता. त्यावेळी आरोपीने खान यांना आपला संपर्क क्रमांक देऊन भविष्यात सोफासेट लागल्यास संपर्क करण्यास सांगितले होते.

त्यानुसार खान यांनी १६ एप्रिल रोजी आरोपीला फोन करून आणखी सोफासेटची मागणी केली. तेव्हा आरोपीने सोफासेटऐवजी, आपल्या मित्राच्या शेतात सापडलेले सोने अत्यंत कमी किमतीत देण्याचे आमिष दाखवले. आरोपीने खान यांना मुडाणा गावाजवळ बोलावले.

तिथे दोन इसम (आरोपी क्र. १ चेहरा गोल, डोक्याला रुमाल, आकाशी शर्ट; आरोपी क्र. २ नेव्ही ब्लू शर्ट, निळी पॅन्ट) खान यांच्याजवळ आले. त्यांनी सोन्यासारखा पिवळा धातू दाखवून पैशांची मागणी केली. खान यांनी एटीएममधून ६० हजार रुपये व स्वतःजवळचे १० हजार असे एकूण ७० हजार रुपये आणले.

तिसरा आरोपी काही अंतरावर उभा होता. त्याने सोने त्याच्याजवळ असल्याचे सांगून पैसे एका आरोपीकडे देण्यास सांगितले.खान यांनी ७० हजार रुपये दिल्यानंतर, तिन्ही आरोपी सोने न देता त्यांची दिशाभूल करून पसार झाले.खान यांच्या तक्रारीवरून महागाव पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

पोलिस निरीक्षक धनराज निळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक रंगराव राठोड, विनोद जाधव, निलेश पेंढारकर, सुशील चिके, अतिश जरंडे, गजानन खेडकर, निर्मळकर यांच्या पथकाने फसवणूक करणारे आरोपी फकीरराव पांडुरंग जाधव (वय ४०), विठ्ठल पांडुरंग पवार (वय ३४, रा. पिंपळगाव, ता. पुसद) आणि बाबुराव अर्जुन चव्हाण (रा. पिंपळगाव, ता. पुसद) या तिघांना काही तासांतच जेरबंद केले.

त्यांच्यावर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!