उमरखेडउमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यामहाराष्ट्रयवतमाळसामाजिक

अमृत महोत्सव व सुवर्ण सहजीवन सोहळ्याचे औचित्य: माने परिवाराकडून २०१ वृक्षांचे दान!

🚨भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक व वृक्ष संवर्धन समितीला २०१ वृक्ष सुपूर्द पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक!

✍️सिद्धार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466

​उमरखेड: – ग्लोबल वॉर्मिंगचे संकट आणि पर्यावरणाचा वेगाने होणारा ऱ्हास पाहता आज वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ही काळाची गरज बनली आहे. याच सामाजिक जाणिवेतून उमरखेड येथील शिवकमल मंगल कार्यालयात आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात माने परिवाराच्या वतीने ‘भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक व वृक्ष संवर्धन समिती’ला २०१ वृक्षांचे अनोखे दान देण्यात आले. पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमाची सध्या तालुक्यात मोठी चर्चा आहे. ​हा अनोखा सोहळा माने परिवारातील अत्यंत महत्त्वाच्या आणि आनंदाच्या तीन क्षणांचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला होता.

लोकनेते माजी आमदार दिवंगत भाऊसाहेब माने यांच्या सुनबाई श्रीमती इंदुमती पंजाबराव माने यांचा ७७ वा जन्मदिवस व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती कल्याणराव भाऊसाहेब माने यांचा ७५ व जन्म दिवस यांचा अमृत महोत्सव आणि कल्याणराव माने व त्यांच्या सहचारिणी कांताबाई कल्याणराव माने यांच्या सुवर्ण सहजीवनाची यशस्वी ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या त्रिवेणी संगमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कौटुंबिक सोहळ्याला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली. सहसा कौटुंबिक सोहळे हे केवळ कौतुक आणि आनंदापुरते मर्यादित राहतात, परंतु माने परिवाराने या आनंदाच्या क्षणाला थेट पर्यावरणाशी जोडले. वाढत्या जागतिक तापमानाला (ग्लोबल वॉर्मिंग) आळा घालण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर हिरवळ वाढवण्यासाठी माने परिवाराच्या वतीने थेट २०१ वृक्षांचे लागवड करण्याचा संकल्प करून हे वृक्ष दान करण्यात आले. हे वृक्ष दान ‘भाऊसाहेब माने कार्बन क्रेडिट बँक व वृक्ष संवर्धन समिती, उमरखेड’ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, पुढील महिन्यात या समितीच्या माध्यमातून स्व. पंजाबराव माने स्मृती दिना निमित्त दरवर्षी होणाऱ्या वृक्षारोपण कार्यक्रमा अंतर्गत
या वृक्षांचे रोपण व संवर्धन केले जाणार असे जाहीर करण्यात आले.

​या सोहळ्याला उमरखेड शहर व परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वच स्तरातून माने परिवाराच्या या पर्यावरणपूरक आणि आदर्शवादी निर्णयाचे भरभरून कौतुक करून शुभेच्छा देण्यात आल्या.

चौकट :-“कुटुंबाची प्रगती ही अनेक पिढ्यांच्या कष्ट, त्याग आणि संस्कारांची देण असते. त्या ऋणाची जाणीव ठेवत, परिवारातील ज्येष्ठांनी जगलेल्या प्रत्येक वर्षामागे एक वृक्ष लावून पृथ्वीला हिरवाईची भेट देणे, हीच आजच्या काळाची खरी गरज आहे.”
– डॉ. विजयराव माने, उमरखेड

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button