समाजसेवा आणि वैद्यकीय मार्गदर्शन क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व

अब्दुल मुदसिर सर यांचा जमाते इस्लामी हिन्द महाराष्ट्रकडून विशेष सन्मान
✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर सह संपादक मो.9823995466

उमरखेड (प्रतिनिधी): समाजातील गरजू आणि रुग्णांसाठी अखंडपणे कार्य करणारे अब्दुल मुदसिर सर (पूसद) यांना जे.आय.एच. महाराष्ट्रच्या आरोग्य व वैद्यकीय मार्गदर्शन विभागातर्फे “उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार” प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्याची दखल घेत देण्यात आला आहे.

अब्दुल मुदसिर सर हे गेल्या दहा वर्षांपासून गरजू नागरिकांना वैद्यकीय मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देत आहेत. त्यांनी शासन योजनांचा आणि सामाजिक संस्थांचा समन्वय साधून २०० पेक्षा अधिक बायपास सर्जरी, १५० हून अधिक अँजिओप्लास्टी तसेच ५० पेक्षा अधिक कॅन्सर रुग्णांना उपचार मिळवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेकांना विद्यार्थ्याना १ करोड च्या जवळ वजीवन प्राप्त झाले आहे.

शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. त्यांनी विविध ट्रस्ट आणि शासन योजनांमार्फत एक कोटी रुपयांहून अधिक शैक्षणिक शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या, तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत करिअर मार्गदर्शन, शैक्षणिक साहित्य आणि शैक्षणिक सल्ला उपलब्ध करून दिला.

कोविड-१९ च्या काळात अब्दुल मुदसिर सरांनी असंख्य गरजू कुटुंबांना राशन किट, औषधे आणि आर्थिक सहाय्य पुरविले. त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रुग्णालये, क्वारंटाईन सेंटर आणि गरिब वस्त्यांमध्ये जाऊन मदतकार्य केले. त्या काळात त्यांनी केलेल्या सेवेमुळे शेकडो कुटुंबांचे जीवन सुरक्षित राहिले.

याशिवाय, पूरग्रस्त भागांमध्ये त्यांनी पुणे आणि सांगली येथे मदत कार्य राबवून हजारो नागरिकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविला. त्यांच्या या कार्यामुळे ते मानवतेचे खरे सेवक ठरले आहेत. हा सन्मान स्वीकारताना मुदसिर सर म्हणाले,“हा पुरस्कार माझ्यासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी क्षण आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार सेवा करणे हेच खरे धर्म आणि मानवतेचे कार्य आहे.”
अब्दुल मुदसिर सर यांच्या या निस्वार्थ कार्यामुळे आज अनेक रुग्णांना आरोग्य, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि असंख्य कुटुंबांना आशेचा किरण मिळाला आहे. त्यांचे कार्य हे आजच्या तरुण पिढीसाठी एक जीवंत प्रेरणास्त्रोत ठरत आहे.
