३५ गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप : सामाजिक बांधिलकीचे दर्शन

(निराधार विद्यार्थ्यांसाठी सारथी फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम)
मानवत / प्रतिनिधी. प्रविण घागरेl
मानवत शहरातील सारथी फाउंडेशनच्या वतीने यंदा ही सामाजिक बांधिलकी जपत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निराधार विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाअंतर्गत एकूण ३५ विद्यार्थ्यांना वर्ष भरासाठी आवश्यक असलेल्या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. दर वर्षी प्रमाणे यंदा ही या उपक्रमात वह्या, पुस्तके, दप्तर, युनिफॉर्म, पेन-पेंसिली आदी साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आले.
विशेषतः दत्तक घेतलेल्या निराधार व आधार हरवलेल्या मुला – मुलींना शिक्षणासाठी आवश्यक सर्व सुविधा फाउंडेशनकडून पुरवल्या जात आहेत. फाउंडेशन गेल्या काही वर्षां पासून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलत आहे. “कोणत्याही कारणामुळे शिक्षण थांबू नये” या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज समाजात एक सकारात्मक संदेश देत आहे.
या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन मार्गी लागले असून त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी आवश्यक आधार मिळाला आहे यावेळी सारथी फाउंडेशनचे सदस्य, शिक्षक, पालक तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात साहित्य वाटप कार्यक्रम अत्यंत उत्सा ही वातावरणात पार पडला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य व त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव पाहून उपस्थितांचे मन भरून आले.
या उपक्रमाबद्दल शहरात समाधान व्यक्त केले जात असून सारथी फाउंडेशनचे कार्य इतरांसाठी ही प्रेरणादायी ठरत आहे.
