नागापूर (रुपाळा) येथील अवैध दारूविक्री त्वरित बंद करा, अन्यथा रस्त्यावर उतरणार!

🚨 संतप्त महिला आणि ग्रामस्थांचा उमरखेड पोलिसांना निर्वाणीचा इशारा.

🚨 भेसळयुक्त दारूमुळे ५ तरुणांचा मृत्यू; पोलीस ‘बीट जमादार’ हप्तेखोरीत व्यस्त असल्याचा खळबळजनक आरोप.

✍🏻सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
उमरखेड तालुक्यातील मौजे नागापूर (रुपाळा) येथे गेल्या कित्येक दिवसांपासून सुरू असलेल्या २४ तास अवैध दारूविक्रीमुळे गावातील सामाजिक आणि धार्मिक वातावरण पूर्णपणे गढूळ झाले असून, अनेक महिलांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या अवैध व्यवसायाला स्थानिक बीट जमादाराचे थेट अभय असल्याचा खळबळजनक आरोप करत, “अवैध दारूविक्री त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू”, असा इशारा नागापूर येथील समस्त महिला वर्ग व ग्रामस्थांनी दिला आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पोलीस प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. परवानाधारक दुकानांना वेळेची मर्यादा असते, मात्र नागापूर (रुपाळा) येथे राजरोसपणे २४ तास अवैध दारूची विक्री सुरू आहे. दारुड्यांच्या वाढत्या सुळसुळाटामुळे महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले असून गावात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.


‘बीट जमादार’ हप्तेखोरीत व्यस्त; विक्रेत्यांची अरेरावी वाढली!

एवढा गंभीर प्रकार सुरू असताना उमरखेड पोलीस स्टेशनचे संबंधित ‘बीट जमादार’ स्वतः हप्ते गोळा करण्यात व्यस्त असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “आम्ही पोलिसांना हप्ता देतो, आमचे कोणी काही वाकडे करू शकत नाही,” अशी उद्धट आणि अरेरावीची भाषा अवैध दारू विक्रेते वापरत आहेत. या भ्रष्ट बीट जमादाराची तात्काळ चौकशी करून त्याची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

धार्मिक स्थळांची विटंबना आणि ५ तरुणांचा बळी!
नागापूर परिसरातील पवित्र ‘बालकदास धार्मिक संस्थान’ परिसरात दारुडे दारू पिऊन रिकाम्या बाटल्या फेकतात. मंदिराच्या भिंतीवर लघवी करून परिसर अस्वच्छ केला जातो. यापूर्वीही येथे देवी-देवतांची विटंबना झाली असून यामुळे तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील अवघ्या ५ महिन्यांत नागापूर भागातील ५ तरुणांना भेसळयुक्त दारूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.

•महिलांचा संयम सुटला; आंदोलनाचा इशारा!
या नरकयातनांना कंटाळून आता गावातील महिला वर्गाचा संयम सुटला आहे. “मेहेरबान साहेबांनी या प्रकरणात स्वतः वैयक्तिक लक्ष घालून आम्हा महिलांना न्याय द्यावा, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल,” असा इशारा महिलांनी दिला आहे. निवेदन सादर करतेवेळी माजी सरपंच पी. वाढवे, बबन कोंडबा पुसांडे महाराज, सौ. यमुना आनाव, अंजान, शंकर सरोश, सरोज नंदकिशोर देशमुख, रत्नमाला खिल्लारे, बबिता दिघाडे, बाली राठोड, प्रियांका जाधव, शोभा जाधव, विजया काळे, उमेशा आडे, के. कापसीकर, शितल मुरमुरे, पुजा गवर, सारिका गवर, आशा कुकुले, समिता बुरकुले, उषा भिसे, रंजना भिसे, पुंडलिक विनकरे यांच्यासह गावातील असंख्य महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.



