निवेदनांचा ढिगारा, आंदोलनांचा ज्वालामुखी… तरीही कुलूपबंद तलाठी कार्यालय! जनतेच्या हक्कांवर प्रशासनाची सरळ गदा”

“
“साफसफाई-वीजेचा दिखावा; अधिकारी मात्र बेपत्ता—जबाबदारीपासून पळ, जनतेचा संताप टोकाला”

उमरखेड तालुका प्रतिनिधी –
उमरखेड : बाळदी येथील तलाठी कार्यालयाचा प्रश्न आता केवळ दुर्लक्षाचा राहिलेला नाही; तो थेट जनतेच्या हक्कांवर लादलेला कुलूपबंद अन्याय ठरत आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी प्रहार संघटनेने दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने तत्परतेचा आव आणत कार्यालय परिसराची साफसफाई केली, वीज व्यवस्था सुरू केली—पण हे सर्व आज उघडपणे दिखावा ठरत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

दोन वर्षांचा कालावधी उलटूनही तलाठी कार्यालय नियमित सुरू झालेले नाही. संबंधित अधिकारी कार्यालयात हजर राहत नसल्याने ग्रामस्थांना शासकीय कामांसाठी अक्षरशः दरदर भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे.
निवेदनं झाली, आंदोलनं झाली, बातम्या झळकल्या—तरीही प्रशासन झोपेतच का? जनतेच्या आवाजाला किंमत नाही का? “निवेदनं म्हणजे फक्त कागदाचा तुकडा आणि बातम्या म्हणजे केवळ शाई?” असा जळजळीत सवाल आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पेट घेत आहे.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित महिला अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, त्यांनी “नाव घेऊ नका, मी काही बोलणार नाही,” अशी भूमिका घेतली. एक जबाबदार शासकीय अधिकारी म्हणून ही टाळाटाळ योग्य ठरते का? उत्तरदायित्व टाळणे म्हणजे कर्तव्यच्युती नाही का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थ स्पष्ट शब्दांत म्हणतात“महिला अधिकारी म्हणून आम्हाला आदर आहे; पण अधिकारासोबत जबाबदारीही येते. निष्क्रियता आणि उद्धटपणा यांना आता थारा दिला जाणार नाही.”

याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी ठाम इशारा दिला आहे की, तलाठी कार्यालय तात्काळ नियमित सुरू झाले नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उच्चस्तरीय तक्रारी दाखल करून कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जाईल.
चौकट : ..
प्रहारचा संतप्त सवाल
प्रहारचे सर्कल प्रमुख श्री. प्रवीण बाबूराव इंगळे यांनी या प्रकरणी सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनावर थेट निशाणा साधला आहे.
“प्रशासन जर जनतेसाठी मदत करणारे नसेल, तर मग ते कोणासाठी आहे? जनतेच्या पैशावरच अधिकाऱ्यांचे पगार होतात. आमच्या निवेदनाला न्याय मिळायला हवा होता; परंतु अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता तरी येथील तहसीलदार व बीडीओ या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देतील का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
निष्कर्ष :

साफसफाई आणि वीजपुरवठ्याची फोडणी देऊन प्रशासनाने कर्तव्यपूर्तीचा आव आणला; मात्र प्रत्यक्षात कारभार शून्यच आहे. हा दिखावा किती दिवस चालणार? आता प्रशासन जागे होणार की जनतेचा संताप रस्त्यावर उसळणार—हा थेट सवाल उभा आहे.
एक

