संत रविदास महाराज यांचे विचार आजही प्रेरणादायी – आमदार सिद्धार्थ खरात मेहकर

मेहकर :- राज्य शासनाच्या निर्देशानुसार २०२१ पासुन संत रविदास महाराज यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करण्यात येत आहे.यानिमित्त मंत्रालयात संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आमदार सिद्धार्थ खरात यांनी संत रविदास महाराज यांना अभिवादन केले.

संत रविदास महाराजांनी भजन, कीर्तन व प्रवचनाच्या माध्यमातून समाजातील चुकीच्या अनिष्ट प्रथा, परंपरांवर प्रहार केले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संत रविदास महाराज यांच्या विचारांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला ‘दी अनटचेबल’ हा ग्रंथही संत रविदास महाराज यांनाच समर्पित केला आहे म्हणून त्यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत आमदार सिद्धार्थ खरात यांनी यावेळी व्यक्त केले.

पुढे बोलतांना आमदार खरात म्हणाले की संत रविदास महाराजांचे विचार आजही अनुकरणीय व प्रेरणादायी आहे.संत रविदास महाराज यांचा जन्म १४ व्या शतकात झाला.आज दि .१२ फेब्रुवारी २०२५ रोजी तिथी नुसार त्यांची ६४८ वी जयंती आहे. त्यांनी सर्व समाजांच्या उद्धारासाठी प्रबोधनाचे कार्य केले. त्यांना स्वतःला देखील अन्यायाविरुद्ध संघर्ष करावा लागला.

भारतीय इतिहास आणि साहित्यात संत रविदासांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांनी शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले. सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव त्यांच्या वाणीचा मूळ स्वर आहे.

त्यामुळे आजच्या काळात त्यांचे महान कार्य समजून घेणे खूप महत्वाचे असल्याचेही आमदार सिद्धार्थ खरात या वेळी म्हणाले.

