उमरखेड तालुक्यातीलताज्या बातम्यानांदेड जिल्ह्यातीलमहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षणाकरिता परदेशात जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ‘ – डॉ. आनंदीबाई जोशी .

‘ ————————————————- जयसिंग वाघ… १८ व्या शतकात भारतात शिक्षणाचे वारे वाहू लागले मात्र शिक्षण शूद्र , अतिशूद्र , मुली यांना देणे हे आमच्या धर्माच्या विरुध्द आहे. व तुम्हाला आमच्या धर्मात ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही असे इथल्या धर्माच्या ठेकेदारांनी ब्रिटिशांना ठणकावून सांगितले व त्यांनी या विरुध्द रणशिंग फुंकले होते .

तेंव्हा महात्मा फुले , सावित्रीबाई फुले यांनी हे शिक्षणाचे वारे इथल्या शूद्र , अतिशूद्र तसेच समस्त महिलांपर्यंत नेण्याचे काम अत्यंत धाडसाने केले . इतरांच्या मुलींना शिक्षणाकरिता पुरुषांनी विरोध करणे एकवेळ समजण्यासारखे ठरू शकेल पण , त्या वेळेस स्वतःच्या मुलीला शिकू न देण्याचे काम खुद्द आई , वडील जर करत असतील तर परिस्थिती किती भयावह होती .

याची कल्पना येते . ख्रिस्ती मिशनरी मध्ये जाऊन मुलींनी शिक्षण घेणे तर अधिकच पाप मानले जाई . फुले दाम्पत्याच्या कार्याने तसेच ख्रिस्ती शाळांमुळे परिस्थिती बदलत गेली व शिक्षणाचे महत्व ओळखून शिक्षणाचे विरोधकच अधिक शिक्षण घेऊ लागले व हळु हळु त्यांच्या मुलींनाही शाळेत पाठऊ लागले . अत्यंत कर्मठ असलेल्या घरात आनंदीबाई यांचा जन्म ३१ मार्च १८६५ ला झाला .

त्यांचे माहेरचे व सासरकडील आडनाव जोशी होते . वडिलांनी आनंदीबाईचा विवाह ९ व्या वर्षी २९ वर्षे वयाच्या विधुर असलेल्या गोपाळ जोशी यांचेशी लाऊन दिला . गोपाळ जोशी यांना त्यांच्या आधीच्या पत्नीपासून एक मुलगा झालेला होता .

गोपाळ जोशी कर्मठ घराण्यातील जरी असले तरी ते स्वतः प्रगतिशील विचारांचे होते . त्यांनी आनंदीबाईला ख्रिस्ती मिशनरी मध्ये पाठऊन शिकविले . त्यांच्या या कार्याला घरातून व समाजातून प्रचंड विरोध झाला पण ते ठाम राहिले . पत्नीला शिकविण्याचे काम करून त्यांनी प्रचलित धर्मव्यवस्थेला जसा धक्का दिला तसाच किंवा त्यापेक्षा मोठा धक्का त्यांनी त्यांच्या विधुर सासूला स्वतःकडं ठेऊन घरातील स्वैंपाक करायला लावला . त्याकाळी विधुर महिलेला अत्यंत घृणास्पद वागविले जात असे .

अश्या महिलेचा स्पर्श सुद्धा सहन केला जात नसे . घरातील केराच्या टोपली प्रमाणे तिला घरात एका कोपऱ्यात राहावे लागत असे . जेवण सुद्धा अगदी लांबून दिले जात असे . अश्या परिस्थितीत गोपाळ जोशी विधुर महिलेला मान सन्मान देतात , त्यांनी तयार केलेले अन्न खातात ही मोठी बाब आहे . तत्कालीन समाजव्यवस्थेत हे सुध्दा मोठे धाडसाचे कार्य होते . आता महात्मा फुले , डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक कार्यामुळे महिलांना सर्वच क्षेत्रात मान सन्मान मिळत आहे हे आपण समजून घेतले पाहिजे .

गोपाळ जोशी पोस्ट खात्यात कारकून होते त्यांची बदली कलकत्ता येथे झाली असता त्यांनी तिथल्या मिशनरी स्कूल मध्ये आनंदीबाईस शिक्षणा करिता पाठविले . आनंदीबाई यांना आधीपासून शिक्षणाची आवड होती , त्या आनंदाने शाळेत जाऊ लागल्या .आनंदीबाई घरी अभ्यास करायला लागल्या की त्यांची आई त्यांना खूप मारत असे . मुलीने शिकायचे नसते , घरकाम करून नवऱ्याची सेवा करायची असते असे सारख्या म्हणत असत.

आईच्या मारहाणीला घाबरून अभ्यास नाही केला तर पती गोपाळ जोशी मारायचे . ते कधी कधी खुर्ची फेकून मारत असत . आनंदीबाई यांच्या आईने एकदा तर मुलगी अभ्यास करते म्हणून जळत्या लाकडाने मारले तेंव्हा त्यांना मोठी जखम झाली होती . हे गोपाळ जोशी यांना समजले तेंव्हा ते त्यांच्या सासुवर खूप रागावले . गोपाळ जोशी अत्यंत रागीट होते . काही प्रसंगी ते अतिशय विक्षिप्तपणे वागत असत . आई कडून व नवऱ्या कडून मिळणारा मार सहन करत करत त्यांनी कलकत्ता येथे आपले शिक्षण पूर्ण केले . यावेळी त्यांना ‘ अमेरिकेतील ख्रिस्ती धर्म मंडळ ‘ या संस्थेचे प्रमुख वाईल्डर यांनी खूप मदत केली . खरे म्हणजे वाईल्डर यांच्यामुळेच त्या आपले शिक्षण पूर्ण करू शकल्या.

आनंदीबाई १४ वर्षाच्या असताना एका मुलाला जन्म देतात . प्रसूती विषयी पुरेशी माहिती नसल्याने त्यांचे योग्य बाळंतपण होत नाही , मुलावर योग्य उपचार होत नाही त्यामुळे स्वतःचा मुलगा योग्य औषधाच्या अभावाने केवळ दहा दिवसात मेल्याने त्या स्वतः डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात व त्यांच्या पतीला सुद्धा माझ्या पत्नीने डॉक्टर व्हावे असे वाटते त्यामुळे ते त्यांना सर्व सहकार्य करतात . हे जरी खरे असले तरी गोपाळ जोशी विक्षिप्त वागून पत्नीला अनेकदा मानसिक व शारीरिक त्रास देत होते . एकीकडे महिलांनी शिकलेच पाहिजे असे ते म्हणत असले तरी बऱ्याचदा महिलांच्या शिक्षणाला ते विरोध करीत राहिले . एकीकडे प्रगतिशील विचाराचे म्हणून सांगायचे तर दुसरीकडं प्रचंड अंधश्रद्धा पाळायचे . कलकत्ता येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर वैद्यकीय शिक्षणाकरिता त्या अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतात . कलकत्ता येथे त्या ७ भाषा लिहू लागल्या , बोलू लागल्या . भारतातील शिक्षण पूर्ण झाल्या नंतर त्यांनी भारतात महिला डॉक्टर असणे किती गरजेचे आहे यावर अभ्यासपूर्ण भाषण केले .

त्यांच्या या भाषणाने बऱ्याच लोकांनी त्यांना विरोध न करण्याचा निर्णय घेतला . त्यांच्या या भाषणातून त्यांचे भाषेवर व भाषणावर प्रभुत्व असल्याचे दिसून येते .गोपाळ जोशी यांची आर्थिक परिस्थिती एवढी चांगली नसल्याने त्यांनी समाजाला मदतीचे आवाहन केले तेंव्हा त्यांचे लोक मदत तर करत नाहीत उलट विरोध करतात मात्र जोशी पैशांची जुळवाजुळव करतात . व्हाईसरॉयने २०० रुपयांची मदत केली . काही मदत जनतेने केली यातून कसेबसे एकट्या आनंदीबाईच्या प्रवासाचा पैसा गोळा होतो . परदेशगमन करणे हे धर्मविरोधी मानले आहे त्यामुळे त्यांना अमेरिकेत जाण्या करिता विरोध होताच होता पण एका महिलेने परदेशगमन करणे व त्यातही एकट्या महिलेने ते कृत्य करणे अधिकच धर्मविरोधी होते . ते फारमोठे पाप मानले जात असे . त्यामुळे समाजाने या करिता मोठा विरोध केला पण , या कुटुंबाने तो सर्व विरोध सहन केला व ४ जून १८८३ ला आनंदीबाई एकट्या अमेरिकेला गेल्या .

अमेरिकेत त्या अतिशय धार्मिक मर्यादेत राहिल्या . तिथल्या कारपेंटर कुटुंबाने त्यांच्या शिक्षणाची , राहण्याची सर्व जबाबदारी घेतली . भारतातील एक स्त्री अमेरिकेत शिक्षणाकरिता आली याचे त्यांना खूप नवल वाटत असे . त्यांनी अन्य मिशनरी शाळांमध्ये सुद्धा तशी माहिती दिली . तिथं त्यांनी ‘ वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्वेनिया ‘ या महाविद्यालयात प्रवेश घेतला . त्यांचे पती त्यांना अगदी आनंदाने अमेरिकेत पाठवितात मात्र ते त्यांच्या चारित्र्यावर सारखे संशय घेत राहतात . त्यांच्या या संशयी वृत्तीला वैतागून मध्येच शिक्षण सोडून द्यावे असे त्यांना वाटते . याच दरम्यान तिथं रमाबाई रानडे यांचेशी भेट होते तेंव्हा शिक्षण न सोडण्याचा त्या सल्ला देतात व त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात . खरेतर रमाबाई रानडे यांच्यामुळेच त्या आपले वैद्यकीय शिक्षण पूर्ण करू शकल्या . आनंदीबाई जोशी यांनी ‘ हिंदू आर्य लोकांमधील प्रसुतीशास्त्र ‘ हा प्रबंध दोन वर्षात पूर्ण करून सादर केला . त्यांच्या प्रबंधास सदर संस्थेने मान्यता देऊन दिनांक ११ मार्च १८८६ ला त्यांना वैद्यक शास्त्रातील ‘ डॉक्टर ‘ ( एम. डी . ) ही पदवी बहाल केली .

त्यांच्या या कार्याने त्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून गौरविल्या गेल्या . त्यांनी डॉक्टर पदवी मिळविली म्हणून व्हिक्टोरिया राणीने सुद्धा त्यांचे अभिनंदन केले . अमेरिकेत डॉक्टर होऊन त्या दिनांक १६ नोव्हेंबर १८८६ ला भारतात आल्या . डॉक्टर झाल्याचा प्रचंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर जरूर होता , मात्र त्यांना क्षय रोगाची लागण झाली असल्याने त्या खूप थकलेल्या होत्या . भारतात आल्या नंतर कोल्हापूर येथे अमेरिकेतील ख्रिस्ती लोकांतर्फे चालविले जात असलेल्या ‘ अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल ‘

या नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना वैद्यकीय प्रमुख म्हणून नेमले जाते . तिथं त्या आपल्या कार्याचा ठसा उमटवितात . तिथं त्या भारतात महिलांचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असावे असे बोलून दाखवितात . त्यांना झालेला क्षयरोग हा वाढत गेला व दिनांक २६ फेब्रुवारी १८८७ ला वयाच्या अवघ्या २२ व्या त्यांचे निधन झाले . गोपाळ जोशी त्यांच्या पत्नीचा अंतीमविधी पूर्णतः धार्मिक पद्धतीने करतात मात्र ते त्यांच्या अस्थि नदीत विसर्जित नकरता त्या अस्थि अमेरिकेतील कारपेंटर कुटुंबास पाठवून देतात . हे कुटुंब त्या अस्थि न्यू यॉर्क येथील पोघ किप्सी या गावातील स्मशानभूमीत दफन करून एक लहानशी समाधी बांधतात व त्यावर ‘ आनंदीबाई जोशी १८६५ ते १८८७ शिक्षणा करिता भारतातून आलेली पहिली ब्राह्मण महिला ‘ असा मजकूर लिहितात . आनंदीबाई जोशी यांनी केलेले धाडस , त्यांचे शिक्षण , त्यांचे विचार नव्या पिढीस प्रेरणा देत राहतील . आज त्यांचा स्मृतिदिन त्याकरिता त्यांना विनम्र अभिवादन.लेखक. …. जयसिंग वाघ , अजिंठा हाउसिंग सोसायटी, अजिंठा चौक जळगावसंपर्क ९८८१९२८८८१

बबलू भालेराव / सिध्दार्थ दिवेकर

मुख्य संपादक / सह संपादक- महाराष्ट्र वायरल न्यूज नेटवर्क

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!