विनारॉयल्टी वाळूचा सुळसुळाट; उमरखेड तालुक्यात रेतीघाटांवर नियंत्रणाचा प्रश्न!

✍️ सिध्दार्थ दिवेकर रिपोर्टर (सह संपादक) मो.9823995466
🚨13 घाटांपैकी फक्त 4 अधिकृत; अवैध उत्खननाच्या चर्चांनी प्रशासनासमोर आव्हान

उमरखेड:- उमरखेड तालुक्यात अवैध व विनारॉयल्टी वाळू उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विविध नदीपात्रांतील रेतीघाटांवरून सुरू असलेली वाहतूक, तसेच काही ठिकाणी आढळणारे वाळूचे साठे यामुळे महसूल विभागाच्या नियंत्रणावर प्रश्न उपस्थित होत आहेत.तालुक्यात एकूण १३ रेतीघाट असल्याचे सांगितले जाते.

महसूल विभागाकडे 8 घाटांची नोंद असून त्यापैकी गुरफळी, तिवडी, दिवटपिंपरी आणि कोपरा या चार घाटांवरच परवानाधारकांना विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित घाटांचा लिलाव प्रलंबित असल्याने शासनाच्या महसुलावर परिणाम होत असल्याची चर्चा आहे.स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर रॉयल्टी तपासणी आणि परवाना पडताळणी अधिक काटेकोरपणे करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या उत्खननाबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.नदीपात्रातील अनियमित उत्खननामुळे पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो, अशी भीतीही व्यक्त होत आहे. पावसाळ्यात पूरस्थिती गंभीर होण्याचा धोका वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाईद्वारे अवैध उत्खननावर नियंत्रण आणावे, उर्वरित रेतीघाटांचा लिलाव तातडीने पूर्ण करावा आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अवैध उत्खननाचा प्रश्न केवळ महसुलापुरता मर्यादित नसून पर्यावरण आणि कायदा-सुव्यवस्थेशी निगडित असल्याने प्रशासनाच्या पुढील पावलांकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
