उमरखेड तालुक्यातील शेतकरी आजही पिकविम्यापासून वंचित,शासनाने दिलेले आश्वासन फसवे..!
शेतकरी


उमरखेड (दि.29 नोव्हेंबर) खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सोयाबीन व कापूस या पिकांसह इतरही पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाचे महसूल प्रशासनाने पंचनामे केले. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची लाभ मिळाला नाही. शेतकरी बांधव पिकविम्यापासून वंचितच आहे.नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली. त्यापूर्वीच शासनाने पीकविम्याची लाभ सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळेल असे आश्वासन दिले होते.

परंतु रब्बी हंगामाचा खर्च कसा करावा?
खरिपात कापूस व सोयाबीन या दोन्ही हुकमी पिकांचे मोठे नुकसान झाले. तरीदेखील पीकविमा मिळाला नाही. आता रब्बी हंगामाला सुरूवात झाली आहे. शेतकरी बांधवांनी गहू व चना पेरला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा करावा.या विवंचनेत शेतकरी बांधव आहेत.
आजपर्यंतदेखील झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळाली नाही. केंद्र सरकारने पिकांचे नुकसान शेतकऱ्यांना मिळावे म्हणून ‘प्रधानमंत्री पीक विमा योजना’ सुरू केली आहे. परंतु शासनाने ज्या कंपनीची नियुक्ती केली ती कंपनीच आपल्या कर्तव्यात हयगय करीत असल्याचे दिसून येत आहे.
शासनाच्यामूळ उद्देशालाच हरताळ फासण्याचे काम कंपनीकडून केले जात आहे.

खरीप हंगामात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पीकविमा वाटप करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु, आता दिवाळी सण पार पडून एक महिना उलटला आहे, शेतकऱ्यांना छदामही मिळाला नाही.
