परभणीच्या गोविंदाने थेट जापानचीच बायको केली..!
(मुलीचा आई – वडिलांनी टोकियोतुन येत केलं रामपुरीत कन्यादान)

मानवत/ प्रतिनिधी. प्रविण घागरे.
परभणी :- 90 च्या दशकातील बहुतेक जणांनी प्रा. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघाले लंडनला हे एक पत्री प्रयोगाचे नाटक ऐकले व पाहिले होते परंतु आता मात्र परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातील गोविंद रामपुरीकर यांनी वऱ्हाड निघाले लंडनला याला फाटा देत वऱ्हाड आलंय टोकिओहून याची प्रचिती जिल्ह्याला दिली. तालुक्यातील रामपुरी गावातील गोविंद रामपुरीकर या युवकाचे थेट जापान च्या जेनिफर या युवतीशी सुत जुळले. त्यानंतर दोघात प्रेम झाले.

जेनिफरला भारतीय संस्कृती विषयी आकर्षण होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आणि जपानच्या टोकियो मधून थेट परभणीच्या रामपुरी हे गाव गाठले. सोबत जेनिफर चे आई-वडील देखील मुलीचे कन्यादान करण्यासाठी आले. आणि मोठ्या थाटामाटात परभणीच्या रामपुरी गावात हा लग्न सोहळा पार पडला.

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील रामपुरी गावचा गोविंद पहिली ते आठवीपर्यंत गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकला. नववी व दहावीचे शिक्षण लातूर जिल्ह्यात मावलगाव (ता.अहमदपूर) येथे घेतले. त्यानंतर अकरावी व बारावी सायन्स त्याने परभणीतील भारत – भारती कनिष्ठ महा विद्यालयातून पूर्ण केले.

पुढे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महा विद्यालयातून 2016 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स या विषयात पदवी संपादित केली. त्यानंतर पुणे येथे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीमध्ये 2 वर्षे जॉब केला, दरम्यान टाटा कंपनीने त्याला एका प्रोजेक्टसाठी जपान देशात पाठवले.
जपानमधील टोकियो शहरात कंपनीत काम करत असताना त्याच भागात कॉर्पोरेशन लोकल बॉडीमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर असलेल्या राधिकासोबत कामा निमित्ताने ओळख झाली आणि ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. काही दिवसांनी गोविंदने जपानमधील दुसरी कंपनी जॉईन केली.

राधिकाला भारतीय संस्कृतीबद्दल विशेष आकर्षण असल्याने अधून मधून त्या विषयावर चर्चा व्हायची. दोघांनी लग्न करायचं ठरवलं आणि आपापल्या कुटुंबियांना निर्णय कळवला.
राधिकाचे वडील नोकरीतून रिटायर झालेले असून आई अजूनही जॉब करते. वडिलांनी मुलीच्या निर्णयास होकार दिला मात्र आईला जावई बाहेर देशातला असल्याने सुरुवातीला मुलीची काळजी वाटली आणि तिची संमती मिळायला जवळपास एक वर्ष लागलं.
अखेर दोन्ही बाजूनं होकार मिळताच जपानमध्येच लग्न करायचं आणि कुटुंबीयांसह जवळच्या नातेवाईकांना तिकडं बोलवायचं असा विचार गोविंदनं मांडला. मात्र त्याच्या वडिलांच्या इच्छेनुसार रामपुरी येथेच स्वखर्चानं व भारतीय पद्धतीनं लग्न करण्याचं ठरलं. गोविंदचे वडील गावाकडे शेती करतात. त्यांना कोरडवाहू जमीन असून दोन मुलं, दोन विवाहित मुली आहेत. शेती विकून त्यांना मुलीची लग्नं करावी लागली. लहान मुलगा गोविंद याने मोठ्या कष्टानं शिक्षण घेऊन मोठ्या पदावर विदेशात तो खासगी कंपनीत नोकरीला आहे.

शनिवार दिनांक 10 मे 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता रामपुरी येथील श्री दत्त मंदिरात गोविंद व राधिका यांचा विवाह सोहळा थाटात पार पडला.
यावेळी जवळपास 2 हजार लोक उपस्थित होते. एवढे लोक पाहून राधिकाच्या आई – वडीलांना आश्चर्यच वाटलं. कारण त्यांच्याकडं कोणत्याही कार्यक्रमाला मोजकीच माणसं येतात. भारतात ग्रामीण भागात छोटी गावं म्हणजे एक कुटुंबच असतं, असं त्यांना सांगण्यात आलं साता समुद्रापार जन्म झाला असला तरी आता जन्मोजन्मी एकत्र राहायचं हे वचन गोविंद आणि राधिकानं एकमेकांना दिलं आहे. दोघांच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाचा बार अगदी दणक्यात उडवून दिला. पाहुणचाराने जपानी कुटुंब भारावले राधिका लग्नापूर्वी आठ दिवस आधीच आई – वडिलांसोबत भारतात आली होती.

भारतातील ताजमहल व इतर पर्यटन स्थळांना भेटी देऊन ते रामपुरी येथे पोहोचले त्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाचा त्यांनी आनंद घेतला. हिंदू संस्कृतीतील रितीरिवाज व धार्मिक विधी जाणून घेत मराठमोळ्या मंडळीचा खास पाहुणचार घेतला. लग्नानंतर वरासह नववधू, तिचे आई, वडील हे नांदेडहून बंगळूर मार्गे जपानला रवाना झाले.
